पुण्याला जुलैअखेर पुरेल इतका पाणीसाठा
पुणे – जुलैअखेरपर्यंत पुणे शहराला पाणीपुरवठा करता येईल, एवढा उपयुक्त पाणीसाठा पानशेत व खडकवासला धरणांमध्ये जमा झाला आहे. सध्या पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात ४० टक्के कपात करण्यात आली आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काल आणि आज दिवसभरात पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या. मात्र, त्यापूर्वीच्या दोन दिवसांत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे धरणातील साठ्यात वाढ झाली. वरसगाव आणि पानशेत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एक जूनपासून प्रत्येकी पावणेदोनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १३९ मिलिमीटर पावसाची; तर खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आज सायंकाळी साडेपाचपर्यंत प्रत्येकी दहा मिलिमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद झाली.
जून महिन्यामध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने, पाणीपुरवठ्याचे नियोजन कोसळले. पाटबंधारे विभागाने नेहमीप्रमाणे १५ जुलैपर्यंतचा पाणीसाठा राखून ठेवला होता. पाणीसाठ्यात वाढ होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात २१ जूनपासून २० टक्के कपात करण्यास सुरवात झाली. त्यानंतर, एक जुलैपासून ३० टक्के कपात सुरू झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दोन जुलैला सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात ४० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय घोगरे म्हणाले, “”धरणांमध्ये दोन जुलैला ०.५३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या तीन दिवसांत शहरामध्ये पाणीपुरवठा केल्यानंतर, पानशेत व खडकवासला धरणांमध्ये ०.४० टीएमसी पाणी शिल्लक राहिले असते. रविवारी सकाळी खडकवासला धरणामध्ये ०.५६ टीएमसी आणि पानशेत धरणामध्ये ०.१४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. म्हणजेच दोन्ही धरणांत ०.७० टीएमसी पाणीसाठा असून, गेल्या चार दिवसांतील पावसामुळे धरणातील साठ्यामध्ये ०.३० टीएमसीने वाढ झाली आहे. पुणे शहराला वर्षाला सुमारे १५ ते १६ टीएमसी पाणी पिण्यासाठी पुरविले जाते. सध्या धरणात जमा झालेले पाणी जुलैअखेर पुरू शकते. वरसगाव आणि टेमघरधरणांच्यपाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असला, तरी त्या दोन्ही धरणांमध्ये सध्या उपयुक्त साठा शिल्लक नाही.”
Category: